Join the gang!

Tuesday

कोकणातली गोष्ट (खऱ्या अनुभवावर आधारित)

कोकणातली गोष्ट. आम्ही काही जण तिथे चित्रकलेसाठी गेलो होतो. कोकणातील typical गाव. कौलारू घरं, शेणाने सारवलेले अंगण. पुढे पडवी. आतील खोल्यांभोवती लाकडी व्हरांडा. घरांच्या मागे वाडी. लांबलचक. तीत आंबा, नारळ, काजू, फणस, पोफळी, इत्यादी झाडे. अळूच्या पानांचे हे मोठे ताटवे. एकच main असा रस्ता. जास्तकरून तांबड्या मातीचा. तसा निमुळताच. बैलगाडी गेली कि लाल धुळीचे लोट उठायचे. गाव समुद्रालगत, त्यामुळे रस्त्याच्या एका बाजूच्या घरांच्या मागे वाडी संपली की वाळूचे साम्राज्य सुरु. त्यापुढे लाटांचे.

दिवस चित्र काढण्यात छान गेला. रात्री जेवणानंतर गप्पा वैगेरे. तसं तिथे मग बाकी काही करायला नव्हते, म्हणून आम्ही एक दोघी जणी रात्री फेरफटका मारायला निघालो. रात्री त्या main रस्त्यावर दिवे पेटलेले होते. दोन दिव्यांमध्ये बरेच अंतर. बहुतेक सर्व घरांची दारे बंद व आतमध्ये अंधार. रस्त्यावर एखादा cycleस्वार सोडला तर शुकशुकाट. पुढे पुढे तर घरं पण नव्हती. फक्त वाड्या, आणि शहरात कुठेच दिसत नाही असा काळामिट्ट अंधार. ह्या point ला परत वळणेच योग्य वाटले.

तसेच परत येत असताना एक आवाज कानी पडला. कुठेतरी ढोल, तबला अथवा अन्य काही तालवाद्य बडवल्याचा. आणखी थोडे पुढे आल्यावर एक जुने पडके असे घर लागले. एक छोटी खिडकी उघडी होती. थांबुन पाहिले. थेट आतल्या एका खोलीत लालसर असा उजेड. कंदिलातून येईल तसा. आणि एक आकृती. माणसाचीच. उंच, सडपातळ आणि ताठ. बसलेली. डोके जरासे मागे टाकलेले जणू समोर वर कोणाकडेतरी बघत आहे. हात पुढे ढोल बडवण्यात मग्न. नव्हे, संपूर्ण शरीरच त्या frenzied वाजवण्यात सामील झालेले. घराच्या आजूबाजूला दाट झाडी. दुसरा एकही कुठे दिवा अथवा प्रकाश नाही. चार-पाच मिनिटे आम्ही ते धृश्या पाहतच राहिलो. अंगावर एकदम शहारा आला. चला, इथून निघूया म्हणत आम्ही भरभर पुढे चालत गेलो.

सकाळी कुतूहल म्हणून मी लवकर बाहेर पडले. 'त्या' घरापर्यंत पोहोचले. घर ओसाड. खिडक्या सगळ्या बंद. दारावर कुलूप लावलेले.

© अलका येरवडेकर

2 comments:

  1. Must have been an amazing experience. Its these small experiences which enlighten the mind. Both the watcher and the watched were in a combined hypnotic frenzy!

    ReplyDelete
  2. Indeed it was, Ashwini :) Glad you enjoyed the read.

    ReplyDelete